मोदी विरोधासाठी देश पेटवण्याचा घातक खेळकेंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून काही राज्यामध्ये तरूणांच्या हिंसक आंदोलनाचे लोण पसरले. या योजनेला विरोध करण्यासाठी रेल्वे डबे जाळणे, रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणां तोडणे, दगडफेक, रस्त्यांवर सार्वजनिक, खासगी मालमत्तेची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणे अशा अनेक हिंसक घटना घडल्या. तरूणांचे हे हिंसक आंदोलन पाहुन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे देशाचे भावी सैनिक बनु इच्छिणारे हेच ते तरूण आहेत का? हे हिंसक आंदोलनकर्ते देशाच्या रक्षणासाठी संरक्षणकर्ते सैनिक म्हणून दाखल होणार आहेत का?  कारण राष्ट्राचे संरक्षणकर्ते, सैनिक बनु इच्छिणाऱ्या तरूणांच्या मनात राष्ट्राप्रती संवेदना असतात, आदर असतो. रस्त्यावर उतरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मनोमन मान्य असेल हेच मुळी पटत नाही. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही विचार केल्यास आपल्यालाही जाणवते की , आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, जी गोष्ट आपल्याला आपलीशी वाटते त्या गोष्टीची नासधुस, नुकसान करणे असा विचार आपल्या मनालाही शिवत नाही. अग्नीपथ ला आक्षेप घेणाऱ्या, विरोध करणाऱ्या मंडळींचे छुपे हेतू जाणून घेणे आवश्यक ठरते.   

14 जून रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ या योजनेचा प्रारंभ करताना या योजनेची संपूर्ण माहितीही त्यांनी दिली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 जून पासून काही राज्यात तरूणांच्या हिंसक आंदोलनाला सुरूवात झाली. मुळात ही योजना काय आहे, योजनेचा उद्देश, फायदा काय आहे, यामुळे तरूणांचे खरेच नुकसान होणार असेल तर ते कसे अशा अनेक शंका , प्रश्न याबद्दल चर्चा न करताच कायदा हातात घेत थेट आंदोलन सुरु करणे हा आततायीपणाच होता.देशाचे भौगोलिक स्थान,शेजारी देश,संरक्षणापुढील आव्हाने पाहता भारताच्या सैन्यदलात वाढ करणे गरजेचे आहे.सैन्यदलाच्या केवळ संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक, कौशल्याधारित वाढ करून सैन्यदलाचे आधुनिकीकरण करणे ही लष्कराची गरज आहे. सर्वात तरूण देश अशी जगात भारताची ओळख आहे. भारताकडे उपलब्ध तरुण मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी अग्निपथ योजना हे उत्तम माध्यम आहे. इस्त्रायल, अमेरिका, रशिया, चीन या देशांनीही अशा स्वरूपाची  अल्प मुदतीची ( शॉर्ट टर्म ) सैनिकी सेवा यापूर्वीच सुरु केली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि तरूणांच्या उत्तम भविष्यासाठी या योजनेची आवश्यकता आहे. चीन व पाकिस्तानी सैन्यांच्या वाढत्या कुरापती, दहशतवादी कारवाया, देशांतर्गत नक्षलवाद्यांच्या कारवाया पाहता देशात अग्नीवीर पद्धतीचे सैन्यबळ मोठ्या संख्येने असणे गरजेचे आहे. अधिकाधिक तरूणांना सैनिकी प्रशिक्षण दिल्याने देशांतर्गत सुरक्षेसाठी ते उपयुक्त ठरते. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अशा प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता जाणवली होती. अग्निवीर म्हणून दाखल झाल्यानंतर त्यातील चांगली कामगिरी बजावणाऱ्या व लष्कराच्या निकषांत बसणाऱ्या उमेदवारांना सैन्यात दीर्घकालीन सेवेसाठी दाखल होण्याची संधी दिली जाणार आहे. अन्य आग्निवीरांना सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल ( सीआरपीएफ ), राज्य सरकारांची पोलीस सेवा यात नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे सैन्य दलाची गुणवत्ताही सुधारण्यास मदत होणार आहे. अग्नीपथ मुळे सैन्याची भरती प्रक्रिया बंद होणार नसून ती चालूच राहणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या 10 टक्के अग्नीवीरांना लष्करात दाखलही करून घेतले जाणार आहे. ही वस्तुस्थिती समजून न घेता या योजनेला विरोध केला जात आहे.       

 


या योजनेला विरोध करणाऱ्या मंडळींना एकच प्रश्न विचारावासा वाटतो आहे, तो म्हणजे या योजनेमुळे रोजगार निर्माण होतो आहे तोच तुम्हाला नको आहे का? एकीकडे बेरोजगारी वाढते आहे म्हणून गळे काढायचे आणि दुसरीकडे केंद्र सरकार रोजगार देते आहे तर त्याला हिंसक विरोध करण्यासाठी तरुणांना भडकावून द्यायचे. कॉंग्रेस , कम्युनिस्ट आणि जी जी मंडळी या योजनेला विरोध करत आहेत त्यांचा या योजनेद्वारे निर्माण होणाऱ्या रोजगारांनाच विरोध आहे , हाच या आंदोलनामागचा अर्थ आहे, असे स्पष्टपणे म्हणावेसे वाटते. हा घातक खेळ नागरिकत्व सुधारणा कायदा ( सीएए ) व कृषी कायद्यातील बदलाविरोधात झालेल्या आंदोलनावेळी खेळला गेला होता.       

या योजनेचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील तरुणांना मिळणार आहे. ग्रामीण भागातील 17 ते 22 वयोगटातील तरूणांसाठी ही योजना सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हा तरूण वर्ग त्यांना प्रशिक्षण, चार वर्षाच्या कार्यकाळात सरकारी वेतन,  योजनेची मुदत संपल्यावर निश्चित रक्कम, उमेदवारी काळात चांगले काम केल्यास लष्करात दाखल होण्याची संधी असे एक न अनेक फायदे असताना केवळ मोदी सरकारला विरोध म्हणून या योजनेला विरोध केला जात आहे. 4 वर्षांतील सेवेच्या काळात उमेदवारांना पदवीचे औपचारीक शिक्षणही पूर्ण करता येईल. या सेवेतून बाहेर पडल्यावर शाररिक, मानसिक व वैचारिक दृष्ट्या उत्तम विकास झाल्याने त्यांना नोकरी, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. केंद्र सरकारकडून या तरूणांना 10 टक्के आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. अनेक नामांकित कंपन्यांमध्येही या अग्निवीरांना प्राधान्य दिले जाणार आहे. हल्लीच्या पिढीला शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधेपर्यंत, नोकरी मिळेपर्यंत वयाची पंचविशी केंव्हाच ओलांडली गेलेली असते. पंचविशीनंतरच तरूणांचे करियर सुरू होते. हे ध्यानात घेता अग्नीपथ मुळे युवकांचे नुकसान होणार हा दावा सर्वार्थाने चुकीचाच आहे. हळूहळू या हिंसाचाराचे पडद्यामागचे सूत्रधार प्रकाशात येत आहेत. यातून आपल्या राजकीय आणि व्यावसायिक दुकानदाऱ्या बंद पडू नयेत यासाठी देश पेटवायला निघालेल्या टोळक्यांचा भेसूर चेहराच जगासमोर येतो आहे.   

  

(लेखाची पूर्वप्रसिद्धी मनोगत पाक्षिक, 1 जुलै 2022) 


Comments

Popular posts from this blog

नदी के उस पार...

24/7 घरात बसणं...