कर्तृत्ववान स्त्री-शक्तीचा गौरव





लोकशाही व्यवस्थेतले सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पद. लोकशाही व्यवस्था असलेल्या या सर्वात मोठ्या देशातल्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या महिला नेता द्रौपदी मुर्मू यांची निवड होणे हा दुग्धशर्करा योग आणि सुदृढ लोकशाहीचे द्योतक आहे. जागतिक पातळीवर आज भारताला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तेव्हा आजघडीला भारताचे प्रतिनिधित्व करणे व राष्ट्रपती पद सांभाळणे हे जोखमीचे व आव्हानात्मक असताना द्रौपदी मुर्मू यांच्या सारख्या कणखर व्यक्तिमत्त्वाची निवड होणे हे अतिउत्तमच आहे.

ओडिशातील संथाल कुटुंबात जन्मलेल्या द्रौपदी यांनी केवळ कुटुंबिय, समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन खर्ची केले. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांनी आपण शिक्षण पूर्ण करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी त्या नोकरी करू लागल्या. पुढे लग्न होऊन संसार सुरू झाल्यावर मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. एक आई या नात्याने त्यांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले. कालांतराने त्यांनी शिक्षिका म्हणून सेवा सुरू केली. याच काळात त्यांनी एका संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ही सुरू केले. राजकारणाच्या माध्यमातून आपल्या समाजाची अधिक सेवा करता येईल या हेतुने त्यांनी राजकारणात पदार्पण केले.  नगरसेविका, जिल्हा परिषद पदाधिकारी या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर त्या राज्याच्या राजकारणात उतरल्या. सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या नंतर त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषवले. मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी कुटुंबाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले नाही.

दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनुभव नसताना मंत्रिपदाची जबाबदारी कशी सांभाळली यांच्या आठवणी सांगितल्या. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांना वाणिज्य व परिवहन खात्याचे राज्यमंत्रीपद दिले गेले. कोणताही पूर्वानुभव नसताना राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यावर त्या बावरल्या नाहीत. त्या खात्यासंबंधित पुस्तके वाचून, माहिती गोळा करून त्यांनी या खात्याच्या जबाबदारीला न्याय दिला.  आपण एक आदिवासी समाजातून आलेल्या महिला असल्याने आपल्याकडे शासकीय व राजकीय व्यवस्थेचे दुर्लक्ष होईल हे गृहित धरून त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आणि मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या सलग दोन वेळेस यशस्वीपणे सांभाळल्या. यातून त्यांचे स्वावलंबी व अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडले.

ओडिशा विधानसभेच्या 2009 च्या निवडणूकीत त्यांना अपयश आल्यावर त्या त्यांच्या मूळ गावी परतल्या. या कालखंडात व्यक्तिगत आयुष्यातील संकटानांही त्या खंबीरपणे सामोऱ्या गेल्या. ऑक्टोबर 2010 साली त्यांच्या एका मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेचा मुर्मू यांना मानसिक धक्का बसला. या दु:खातून सावरत असतानाच 2013 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा भुवनेश्वर येथील अपघातात मृत्यू झाला. या आघातांमुळे नैराश्यात गेलेल्या मुर्मू यांनी आधार घेतला तो ध्यानसाधनेचा.  ध्यानधारणेच्या साहय्याने त्यांनी नैराश्यावर मात करत आपल्या समाजासाठी पूर्वीप्रमाणे काम करणे सुरू केले.  


प्रहार, १४ जुलै २०२२


“Happiness is beneficial for the body, but it is grief that develops the powers of the mind."  या इंग्रजी वचनानुसार, दोन्ही मुले आणि पती वियोगाच्या दु:खातून खंबीर मनशक्तीच्या आधारे त्या सावरल्या. आमदार आणि मंत्रिपद जबाबदारी सांभाळताना दाखवलेली कार्यक्षमता भाजपा पक्षश्रेष्ठींच्या नजरेत भरली होती. त्यांची दखल 2015 मध्ये त्यांना झारखंडच्या राज्यपाल पदी नियुक्त करून घेतली गेली. मुर्मू यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्यकिर्दीचा तिसरा अध्याय राज्यापाल पदाने सुरू झाला. 2020 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. याकाळात सामान्य जनतेसाठी स्वत:ला कायम उपलब्ध ठेवत त्यांनी आपल्यातील सेवाभावी स्त्रीशक्तीचा प्रत्यय आणून दिला.

2017 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांच्या नावाचा विचार झाला होता. झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळल्याने त्यांचा अनुभव विश्व आणखी व्यापक झाले. राजकीय कारकिर्दीमध्ये निष्कलंक चारित्र्यामुळे त्या कधी वादग्रस्त ठरल्या नाहीत. यामुळेच भारतीय जनता पार्टीचा कट्टर विरोधक असलेल्या समाजवादी पक्षानेही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रमात संथाल सारख्या जनजातींचे अमूल्य योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या जनजातींतील महिलेला देशाचे सर्वोच्च पद भुषविण्याची संधी प्रदान करणे हा भारतीय जनता पार्टीच्या व्यापक राष्ट्रवादी विचारधारेचा अंगभूत भाग आहे. त्यांची निवड हा औपचारिक भाग असल्याने त्याचे अभिनंदन व कारकिर्दीस शुभेच्छा प्रदान करते.


(लेखांची पूर्वप्रसिद्धी - प्रहार, 14 जुलै 2022)

Comments

Popular posts from this blog

"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी"

24/7 घरात बसणं...

नदी के उस पार...