पालकांशी हितगुज

" पापा कहते है बडा नाम करेगा । बेटा हमारा ऐसा काम करेगा ।
 मगर ये तो कोई न जाने , ये  मेरी मंजील है कहा??? 

     खरच किती अर्थपुर्ण ओव्या आहेत. आजच्या या स्पर्धात्मक युगात वावरताना आपल्या मुलांना स्वतःचे एक विशिष्ट असे स्थान निर्माण करता यावं म्हणून आई -वडील हे जास्त प्रयत्नशील असतात. मुलं लहान असताना मुलांनी कोणत्या शाळेत जावं ,कोणाबरोबर खेळायला जावे यापासुन कोणते कपडे घालावे , काय खावं असे सर्वकाही आई -वडीलच ठरवत असतात आणि ते यथायोग्य आहे,तो त्यांचा अधिकार असतो कारण तेव्हा ती मुलं समजदार नसतात परंतु मुलं समजदार झाल्यावर त्यांच्या जीवनातील छोटे -मोठे निर्णय त्यांना स्वतःना घेण्याची संधी द्यावी. पुढे कोणते शिक्षण घ्यावे हे त्यांना त्यांच्या आवडी - निवडी नुसार ठरवू द्यावे. कारण अनेकदा  आई -वडील आपले निर्णय मुलांवर थोपवत असतात. त्यांची क्षमता,आवड लक्षात न घेता स्वतःच्या इच्छेनुसार पुढील शिक्षण क्षेत्रात त्यांना स्पर्धेसाठी उतरवत  असतात. अशावेळी ते शिक्षण त्यांच्या जीवनातील जणू एक काटाच बनत असतो. नकळत आवडत नसलेल्या त्या अभ्यासाच्या ओझ्याखाली त्या पाल्याच्या मनातील एक आनंदी जीवन जगू पाहणारा एक तरुण - एक मुलगा हरवत असतो आणि मग आत्महत्ये सारखे प्रकार घडतात. 
     खरंतर, तुमची मुलं ही तुमची मुलं नाहीतच, चिरंजीव होऊ इच्छिणाऱ्या, जीवनाच्या उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत. तुमच्या देहाच्या वाटेनं जरी ती जन्माला आली असली, तरी तुम्ही केवळ निमित्तमात्र आहात. तुम्ही त्यांना तुमचं प्रेम  दया, पण तुमचे विचार मात्र देऊ नका, तुम्ही त्यांच्या सारखे खुशाल व्हा, होण्याचा प्रयत्न करा, पण त्यांना तुमच्या सारखं बनवण्याचा विचार हि करू नका. लक्षात ठेवा जीवन हे भूतकाळात रेंगाळत नसते , ते नेहमी पुढे जात असते. 
     माणूस हा अनुभवातून शिकत असतो. परंतु आजच्या या स्पर्धात्मक युगात आई -वडील हे आपल्या मुलांना हे अनुभवी शिक्षण देऊ इच्छित नाहीत असेच वाटते. ते त्यांना स्वतःला आलेल्या अनुभवातून जगाची ओळख करून देण्याचा ढोबळ प्रयत्न करीत असतात. अशावेळी मुलांनी कुरकुर अथवा आक्षेप घेतला असता, "आम्ही तुमच्या पेक्षा अधिक पावसाळे पहिले आहेत व जगाची आम्हाला जास्त चांगली ओळख आहे . " असे विधान करून त्यांना गप्प केले जाते. वरील विधान जरी सत्य असले तरी 'प्रत्येक पावसाळा हा सारखा तर नसतो ना ? ' त्यानुसार ह्या दोन्ही पिढीला येणारया अडचणी, अनुभव हे देखील वेगवेगळे असु शकतात ना ? 
     आपली मुलं 'मोठी ' व्हावीत, 'चांगली ' व्हावीत, 'यशस्वी ' व्हावीत असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण हे साधायाचं कसं हा आजच्या पालकांपुढचा प्रश्न आहे. जग झपाट्याने बदलत आहे, जीवनशैली बदलत आहे. टीव्ही, कॉम्पुटर, इंटरनेट, मोबाईल… अशा माध्यमांच्या प्रभावात आणि वाढत्या स्पर्धेच्या ताण-तणावात  वाढणाऱ्या आजच्या मुलांवर संस्कार तरी कसे आणि कुठले करायचे? आजची मुलं  ऐकत नसतील, तर त्यांना शिस्त तरी कशी लावायची? त्याही पुढे जाऊन  पोटच्या पोरांना प्रेम देण्याइतकी फुरसत ही आज पालकांकडे नसेल तर…? पालक 'असणं' वेगळं आणि पालक 'होणं' वेगळं ! पालक होणं  हे एक 'घडणं' असतं. आजच्या काळात पालक होणं म्हणजेच 'सुजाण पालक' होणं. 
     दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं पालकत्व पेलत असतानाच पालक असण्यातला आनंदही अनुभवता येणं म्हणजेच 'सुजाण पालक' होणं !

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी"

24/7 घरात बसणं...

नदी के उस पार...